Pages

Thursday, January 14, 2010

राज ठाकरे ठरले 'युथ आयकॉन'



'ई सकाळ' ने घेतलेल्या 'सांगा तुमच्या मनातील युथ आयकॉन' उपक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना सर्वाधिक ५६ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. त्याखालोखाल २६/११ च्या मुंबई हल्ल्यावेळी शौर्य बजावणारे पोलीस अधिकारी विश्‍वास नांगरे-पाटील यांचे नाव 'युथ आयकॉन' म्हणून ऑनलाईन वाचकांनी आणि तरूणाईने 'एसएमएस'द्वारे सुचविले आहे. आज (१२ जानेवारी) युवा दिन. त्यानिमित्त आपल्या मनातील युथ आयकॉन कळविण्याचे आवाहन गेल्या आठवड्यात 'ई सकाळ'ने वाचकांना केले होते.

'ई सकाळ'वरील आवाहनाला जगभरातून वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. कोणतेही विशिष्ट नाव समोर न ठेवता ऑनलाईन वाचकांना त्यांच्या दृष्टिने कोण 'युथ आयकॉन' वाटतो, हे सांगण्यास सुचविले होते. त्यातून या आवाहनावर जगभरातून सुमारे दीड हजार प्रतिक्रिया वाचकांनी 'ई सकाळ'वर पोस्ट केल्या. या प्रतिक्रियांमधून वाचकांनी सर्वाधिक संख्येने निवडलेल्या नावांवर '५४३२१ एसएमएस' सेवेमार्फत मतचाचणी घेण्यात आली. या दोन्ही प्रक्रियांमधून तरूणाईने त्यांच्या मनातील 'युथ आयकॉन'वर शिक्कामोर्तब केले. ठाकरे, नांगरे पाटील यांच्यासह क्रिकेटचा बादशाह सचिन तेंडूलकर, अभिनेता अमीर खान, माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, कॉंग्रेसचे युवा नेते राहूल गांधी, समाजसेवक प्रकाश आमटे, 'इन्फोसिस'चे संस्थापक नारायण मूर्ती, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितिन गडकरी अशी एकूण दहा नावे 'युथ आयकॉन' म्हणून वाचकांनी सुचविली होती.

विश्वास नांगरे पाटील दुसऱया स्थानावर
राज ठाकरे यांनी एकूण ऑनलाईन आणि एसएमएसवर ५४ टक्के लोकांची पसंती मिळवित युथ आयकॉन असल्याचे सिद्ध केले. महाराष्ट्रात मराठी तरुणांसाठी व मराठी भाषा टिकावी यासाठी आंदोलन करणाऱ्या राज यांनी जगभरातील मराठी माणसाला आकृष्ट केले असल्याचे यातून पुढे आले आहे. मुंबईतील दहशतवादी हल्ल्यावेळी शौर्य बजावणारे पोलीस अधिकारी नांगरे पाटील यांचेही नाव या यादीत सचिन तेंडूलकरच्या आधी, दुसऱ्या क्रमांकावर आहे.

संपूर्णपणे वाचकांचा प्रतिसाद
या संपूर्ण प्रक्रियेमध्ये यामध्ये कोणतीही यादी निश्‍चित नसताना, सुमारे तीन हजार वाचकांनी स्वतः यादी बनविली. युथ आयकॉन म्हणून आपण कोणाचा आदर्श समोर ठेवतो, हे कळविले. त्यामधून समान नावे पुढे आली आणि त्या नावांचा क्रमही एसएमएसद्वारे ठरविण्यात आला. त्यामुळेच यादीमध्ये एकाचवेळी 'इन्फोसिस'चे संस्थापक नारायण मूर्ती यांचे नाव आहे, तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितिन गडकरी यांचेही नाव आले आहे. आदर्श वाटणाऱ्या, भावलेल्या व्यक्तींची नावे वाचकांनी 'ई सकाळ'वर मांडली होती. राजकारण, क्रीडा क्षेत्रापासून मनोरंजन, संगीत, विज्ञान आदी विविध क्षेत्रातील व्यक्तींची नावे यामध्ये होती. 'ई सकाळ'वर 'युथ आयकॉन'साठी आलेल्या नावांमधून दहा नावांची निवड करण्यात आली. त्यावर 'एसएमएस'द्वारे मते मागविण्यात आली.

युथ आयकॉन्स् आणि टक्केवारी
राज ठाकरे - (५६.१५ टक्के)
ठाकरे घराण्याचा वारसा असलेले राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून २००६ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. राज ठाकरेंनी आजपर्यंत मराठी भाषेसाठी अनेक आंदोलने करीत महाराष्ट्रातील तरूणाईच्या मनात स्थान मिळविले आहे.

विश्‍वास नांगरे पाटील - (१०.६२ टक्के)
एका सामान्य कुटुंबातील तरूणाची पोलिस अधिकारी पदापर्यंतची वाटचाल नांगरे पाटील यांच्या रुपाने मराठी युवा मनासमोर आहे. पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण, मुंबई हल्ल्यावेळी त्यांनी केलेली कामगिरी तरूणाईच्या मनावर विशेष ठसली आहे.

सचिन तेंडुलकर - (९.५७ टक्के)
वयाच्या सोळाव्या वर्षीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट अवकाशावर चमकू लागलेला हा सुपरस्टार. सचिनने आज अनेक विक्रम प्रस्थापित करीत आपणच क्रिकेटचा बादशाह असल्याचे सिद्ध केले आहे. सचिनच्या याच कामगिरीमुळे तो आजही करोडो भारतीयांच्या गळ्यातील ताईत आहे.

अमीर खान - (५.७८ टक्के)
आपल्या अभिनयाने जगाला वेड लावणारा अभिनेता अमिर खान आज वयाच्या ४४ व्या वर्षीही तरुणाईमध्ये प्रसिद्ध आहे. 'यादों की बारात' ते 'थ्री इडियट्‌स' पर्यंतचा अमिरचा प्रवास उल्लेखनीय आहे.

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम - (४.६२ टक्के )
भारताचे माजी राष्ट्रपती व मिसाईल मॅन म्हणून ओळख असणारे अब्दुल कलाम यांनी व्हिजन '२०२०' मधून भारताला नवी दिशा दाखविली आहे. 'विंग्ज ऑफ फायर' हे त्यांचे पुस्तक सर्वाधिक लोकप्रिय आहे.

राहुल गांधी - (३.८९ टक्के )
कॉंग्रेसचे युवा खासदार राहुल गांधी वयाच्या चाळीशीत तरुणांचे रोल मॉडेल म्हणून प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. भारताचे भविष्यातील पंतप्रधान म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जात आहे.

डॉ. प्रकाश आमटे - (३.२६ टक्के)
आशियातील नोबेल मानल्या गेलेल्या रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्रकाश आमटे यांचे सामाजिक कार्यातील योगदान मोठे आहे. गडचिरोली जिल्ह्यातील 'हेमलकसा' या प्रकल्पात कुष्टरोग्यांसाठी ते उल्लेखनीय काम करीत आहेत.

नारायण मूर्ति - (२.२० टक्के)
पद्‌मविभूषण पुरस्कार विजेते नारायण मूर्ति यांचा इन्फोसिस टेक्‍नॉलॉजिस या कंपनीच्या स्थापनेत मोलाचा वाटा आहे. भारतातील आयटी क्षेत्रात या कंपनीच्या स्थापनेमुळ एक प्रकारची क्रांतीच आली.

उद्धव ठाकरे - (२.१० टक्के)
शिवसेनेचे कार्याध्यक्ष म्हणून काम करत असलेल्या उद्धव ठाकरे यांनी कमी वेळात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. शिवसेना पक्षाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचविण्यात यांची मोलाची भूमिका आहे.

नितीन गडकरी - (१.७८ टक्के)
भारतीय जनता पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यापासून राष्ट्रीय अध्यक्ष हा नितीन गडकरी यांचा प्रवास उल्लेखनीय आहे. भाजपच्या इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून त्यांचे नाव आता राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचले आहे.

No comments: